फलटण प्रतिनिधी : श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटण येथे श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर आणि भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. तसेच वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर यांनी प्रास्ताविकातून श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्याचा आणि फलटणच्या ऐतिहासिक, सामाजिक व सांस्कृतिक परंपरेतील नाईक निंबाळकर घराण्याच्या योगदानाचा आढावा घेतला. विद्यार्थ्यांनी श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनचरित्रांचे वाचन करून त्यांच्या विचारांचा आदर्श जीवनात अंगीकारावा, असे आवाहन त्यांनी केले. ग्रंथपाल प्रा. पी. एस. तरटे यांनी डॉ. कलाम यांच्या ज्ञाननिष्ठा, जिद्द आणि कठोर परिश्रमांचा उल्लेख करत वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले. वाचनामुळे विचारशक्ती विकसित होते, भाषेवर प्रभुत्व मिळते आणि आत्मविश्वास वाढतो. ‘वाचाल तर वाचाल’ हा संदेश जीवनाला दिशा देणारा असल्याचे त्यांनी सांगितले. मुधोजी महाविद्यालय, फलटण येथील इतिहास विभागाचे सहाय्यक प्राध्यापक अभिजीत कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना माहिती मिळविणे आणि ज्ञान आत्मसात करणे यातील फरक स्पष्ट केला. मोबाईल आणि सोशल मीडियाच्या युगात विद्यार्थ्यांनी पुस्तकांच्या नियमित वाचनाला प्राधान्य द्यावे. कृषी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान, फलोत्पादन, कीड व्यवस्थापन, पीक संरक्षण आणि पर्यावरण संवर्धन यांसारख्या विषयांचे वाचन करावे. तसेच दररोज किमान १५ ते २० मिनिटे वाचनासाठी देऊन वाचलेल्या विषयांच्या नोंदी ठेवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले. कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी वाचन हे ज्ञानप्राप्तीचे प्रभावी साधन असल्याचे सांगितले. पुस्तकांमुळे ज्ञानात भर पडण्याबरोबरच भाषिक कौशल्य, आकलनशक्ती आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता विकसित होते. डिजिटल माध्यमांचा वापर विवेकाने करून विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचा नियमित लाभ घ्यावा. महाविद्यालयात वाचन संस्कृती विकसित झाल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसह व्यक्तिमत्त्वाचाही विकास होईल, असे त्यांनी नमूद केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कुमारी दीक्षा चौगुले हिने केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रा. एस. पी. तरटे, ग्रंथपाल आणि पी. डी. भगत, कृषि सहाय्यक यांनी विशेष परिश्रम घेतले.