फलटण (विशेष प्रतिनिधी):फलटण नाईक निंबाळकर घराण्याने आधुनिक व पुरोगामी विचार जोपासत शिक्षण आणि सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देऊन लोकविकासाचे धोरण नेहमीच राबवले आहे. ब्रिटिश काळात काही स्वतंत्र शासन असलेली संस्थाने होती. कोल्हापूर, सातारा, बडोदा व फलटण ही त्यातील पुरोगामी धोरण अवलंबलेली संस्थाने होती. त्यांनी स्वकीय संस्कार, प्रथा, परंपरा, संस्कृती व लोकभावना जपून प्रगतीचा मार्ग अवलंबला, असे प्रतिपादन मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
सातारा इतिहास संशोधन मंडळ व मधुर जी महाविद्यालय फलटण येथील इतिहास विभागाने “२० व्या शतकातील संस्थाने:फलटण संस्थानचा विशेष संदर्भ”,या विषयावर आयोजित केलेल्या १७ वे वार्षिक अधिवेशन व एक दिवसीय राष्ट्रीय परिषद कार्यक्रमाच्या समारोप कार्यक्रमात मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.अवनीश पाटील उपस्थित होते.या कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून प्रा.डॉ.विजयराव नलवडे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे, प्रा.डॉ.जयपाल सावंत, प्रा.डॉ.संतोष कदम,प्रा.डॉ. तुकाराम शिंदे,डॉ. अनिक रिशे हे उपस्थित होते. पुढे बोलताना मा. श्रीमंत संजीवराजे म्हणाले,फलटण संस्थानात १८८३ साली शिक्षणाचा पाया मुधोजीराजे यांनी घातला. कोल्हापूर,सातारा,बडोदा व फलटण संस्थानांचा इतिहास समकालीन कागदपत्रांत सापडतो, तसेच तो ग्रँड डफ यांनी प्रथमच लिहिलेल्या मराठ्यांच्या इतिहासातही आढळतो. राजर्षी शाहू महाराज, प्रतापसिंह महाराज, श्रीमंत मालोजीराजे, महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी आपल्या संस्थानात शैक्षणिक क्रांती,सामाजिक क्रांती, सहकार व आधुनिकता आणली. यामुळेच पुढे कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी धोंडो केशव कर्वे यांसारख्या शिक्षणमहर्षींनी शिक्षण तळागाळापर्यंत पोहोचवले. आधुनिक शेती, पाणी, पाटबंधारे, कालवे, धरणे, लघुउद्योग, व्यावसायिक शिक्षण, स्त्री शिक्षण, लोकशाही, समतामूल्य, अस्पृश्यता निवारण यांवर भर देऊन संस्थानाची प्रगती केली. हा संशोधनाचा भाग अभ्यासकांनी आवर्जून विचारात घेऊन इतिहास संशोधन केले तर पुढच्या पिढीला हा विकासाच्या इतिहासाचा वारसा मिळेल. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना प्रा.डॉ.अवनीश पाटील म्हणाले की, “सातारा इतिहास संशोधन मंडळ व मुधोजी महाविद्यालयाचा इतिहास विभाग यांचे उपक्रम प्रज्ञानुबंध आहेत.कोल्हापूर,सातारा, फलटण ही संस्थाने सामाजिक व राजकीयदृष्ट्या पुरोगामी व मानवतावादी होती. ब्रिटिशांच्या तावडीत नसलेल्या फलटण संस्थानाला परवानगीशिवाय आपले आधुनिक विचारप्रणालीचे शिक्षण व पुरोगामी विचार रुजवण्याची ताकद होती. या संस्थानात झालेल्या पुरोगामी विचारांचा बाहेर समाजावर होणारा परिणाम मोलाचा होता,याचे संशोधन झाले पाहिजे. फलटण संस्थानाच्या प्रगतीचा आलेख सत्यशोधक पालेकर यांनी १९४३ साली तुलनात्मक पद्धतीने शब्दबद्ध केला.अशा प्रकारे कोल्हापूर, फलटण, सातारा, बडोदा संस्थानांची ब्रिटिश अमदानीत स्वतंत्र ओळख असून त्यांनी संस्थानात आधुनिक लोकशाही आणण्याचा प्रयत्न केला.” या इतिहास परिषदेसाठी प्रा. डॉ. मधुकर जाधव यांनी भोजन खर्च प्रायोजित केला. तसेच प्राचार्य डॉ. राजेंद कोरे (२५,००० रुपये), प्रा. डॉ. संतोष कदम (११,००० रुपये), प्रताप गावडे (५,००० रुपये), मनोज कदम (५,००० रुपये), कौशल्या रणदिवे (५,००० रुपये), संदिप रिशे (५,००० रुपये) आणि माळवदे मॅडम (५,००० रुपये) या सर्वांकडून देणगी स्वरूपात निधी मिळाला. या सर्व देणगीदारांचा तसेच मंडळाच्या कार्यकारिणी सदस्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. या राष्ट्रीय परिषद व वार्षिक अधिवेशनाला महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील प्राध्यापक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.लक्ष्मीकांत वेळेकर यांनी केले आणि आभार प्रा. अभिजित कदम यांनी मानले.