फलटण प्रतिनिधी : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकी साठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी फलटणच्या राजकारणात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी नागरी सहकारी बँक प्रवर्गातून आज दुसरा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी त्यांनी सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
संजीवराजे यांनी नागरी सहकारी बँक प्रवर्गातूनही अर्ज दाखल केल्याने जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील फलटणच्या राजकीय समीकरणांना वेगळे वळण मिळाले आहे. विशेष म्हणजे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनीदेखील आज नागरी सहकारी बँक प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या प्रवर्गात दोन्ही नेत्यांच्या उमेदवारीमुळे फलटणच्या राजकारणात चांगलीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
संजीवराजेंच्या या निर्णयामुळे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासमोर थेट राजकीय आव्हान उभे राहिल्याची चर्चा फलटणच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. दोन्ही नेत्यांनी एकाच प्रवर्गातून अर्ज दाखल केल्याने आगामी काळात जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे राजकारण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, संजीवराजे यांनी यापूर्वी सोसायटी मतदारसंघातून अर्ज दाखल केला असून आता नागरी सहकारी बँक प्रवर्गातूनही अर्ज दाखल केल्याने त्यांच्या पुढील भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननीनंतर आणि माघारीच्या टप्प्यानंतर अंतिम चित्र स्पष्ट होणार असले, तरी आजच्या घडामोडीने फलटणच्या राजकारणात जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रंगत वाढली आहे.