फलटण : आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय महिला हॉकी संघाने सुवर्णपदक पटकावत देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. या ऐतिहासिक विजयात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या फलटण तालुक्यातील कोळकी येथील कन्या कु. ऋतुजा पिसाळ हिचा फलटणमध्ये भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे. देशाच्या विजयात मोलाचा वाटा उचलणाऱ्या या सुवर्णकन्येच्या सन्मानासाठी फलटणकर सज्ज झाले असून, या सोहळ्याबाबत क्रीडाप्रेमी आणि नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सोमवार, दि. १२ ऑक्टोबर २०२६ रोजी मुधोजी हायस्कूल, फलटण येथे सायंकाळी ठीक ६ वाजता हा भव्य सत्कार सोहळा पार पडणार आहे. त्यापूर्वी फलटण शहरातून कु.ऋतुजा दादासाहेब पिसाळ हिची भव्य मिरवणूक दुपारी ठीक ३.३० वाजता क्रांतिसिंह नाना पाटील चौक येथून मिरवणूक काढण्यात येणार असून, शहरवासीयांना आपल्या लाडक्या क्रीडापटूचे अभिनंदन करण्याची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती तथा आमदार मा. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते कु. ऋतुजा दादासाहेब पिसाळ हिचा सत्कार मुधोजी हायस्कूलच्या प्रांगणात सायंकाळी ठीक ६ वाजता करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर तसेच सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
कोळकीच्या मातीतून घडलेली कन्या आंतरराष्ट्रीय क्रीडाक्षेत्रात देशाचा तिरंगा उंचावते, तेव्हा तिचा गौरव हा केवळ एका खेळाडूचा सन्मान राहत नाही. तर तो संपूर्ण फलटण तालुक्याच्या अभिमानाचा क्षण ठरतो. कु. ऋतुजा दादासाहेब पिसाळ हिच्या या यशामुळे स्थानिक खेळाडूंनाही नवी प्रेरणा मिळणार असून, तिचा फलटण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून नागरी सत्कार हा फलटणच्या क्रीडा क्षेत्रासाठी अभिमानास्पद सोहळा ठरणार आहे.
तरी सदरच्या कार्यक्रमाला फलटण तालुक्यातील खेळाडू, क्रीडा प्रेमी नागरिक इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन फलटण तालुका क्रीडा समिती व महात्मा शिक्षक संस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे.